*माझी शाळा*

*माझी शाळा*
--------------------

सर्वप्रथम माननीय अॅडमीनचे आभार प्रकट करतो ..ज्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा समुह काढला...त्यायोगे बालपणीचे ते दिवस आठवुन पुन्हा त्याचे समोर राहु लागले....आजही ती शाळा आठवली की उगीच मोठे झालो असे वाटते.त्या शाळेनिमित्त काहीसे निवडक दोन शब्द सांगायचा माझा प्रयत्न ...खरतर काय लिहावे..शब्दही कमी पडतील अशी माझी शाळा होती..

शाळा म्हटलं की, सगळ्या जुन्या आठवणींना एकदम उजाळा येतो व त्या एका चित्राप्रमाणे डोळ्यांसमोर उभ्या राहतात. आज शालेय शिक्षण पूर्ण होऊन जवळ जवळ बरेच वर्षाचा कालावधी उलटून गेला. तरी आठवणी मात्र अगदी ताज्या वाटतात.

आजही माझी शाळा म्हणजे जशी सोडली तशीच आहे  एक विस्तीर्ण, मोठे प्रशस्त मैदान.. आता जरी बदल झाला असली तरी मी शाळेत असताना ती बैठीच, अगदी घराप्रमाणे होती. चारी बाजूंनी वर्ग होते व त्याला लागुन  त्या प्रशस्त मैदानात जेव्हा खेळाचे सामने व्हायचे तेव्हा दोन कब्बडीचे, दोन लंगडीचे, एक खो-खोचा सामना, उंच उडी, गोळा फेक असे सामने व्हायचे.  त्यात त्या मैदानाच्या चारी बाजूंना वर्ग व मोठी झाडे आहेत. त्यामुळे आम्हाला रोज निरनिराळे पक्षीही पाहायला मिळायचे व  मैदानात दररोज शाळा भरताना प्रथम प्रार्थना व्हायची व नंतर आम्ही सर्व विद्यार्थी शिस्तीने वर्गात प्रवेश करायचो.

आमच्या शाळेत दर शनिवारी चार तास असायचे त्यात योगा, कवायत, डंबेल्स व लेझिम शिकवले जायचे. त्यात वाद्यांच्या सुरात कवायत व लेझिम हे प्रकार व्हायचे. ते नुसते आठवले तरी मन सुखावून जाते. पण खंत वाटते आता बहुतेक कुठल्याच शाळेत ते दिसत नाही. आमच्या वेळेला मधली सुट्टी झाली की,

*वदनि कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे।*
*सहज हवन होते नाम घेता फुकाचे।*
*जीवन करि जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रम्ह*
*उदभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म।*  

ही प्रार्थना व्हायची. आजही ती प्रार्थना म्हणल्यावर मला माझी शाळा आटवते.
शाळेतील खेळाचे सामने असो वा इतर सांस्कृतिक कार्यक्रम, त्यातील मजा व आनंद काही औरच असतो.

आमच्या शाळेत मुख्याध्यापकांचा एक वेगळाच धाक व शिस्त होती. विद्यार्थी त्यांना शाळेबाहेरही तेवढेच घाबरत होते. तसे आमचे सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागत. जर मस्ती केली व अभ्यास केला नाही तर शिक्षाही करत असत. ती त्यांची एक जबाबदारी होती. कारण याच त्यांच्या शिस्त व कर्तव्यातून उद्याचा एक चांगला नागरिक तयार होणार असतो. सगळेच शिक्षक तत्परतेने व जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांसाठी करत असतात. आमच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना आमच्या शिक्षकांबद्दल मान-सन्मान होता व तो आम्ही आजही राखला आहे. आमच्या जवळपास राहणारे शिक्षक आजही भेटले व त्यांची आमची बोलचाल झाली व त्यांना आमची प्रगती कळल्यावर ते आवर्जून म्हणतात. आम्ही शिकविले व तुम्ही शिकलात. म्हणून तुम्ही एवढे मोठे झालात. त्यांनाही आपल्या विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी व अभिमान वाटतो.

आज  शिक्षण पूर्ण होऊन १० ते १२ वर्षे उलटली. पण शाळेतल्या आठवणी तशाच आहेत. कारण आपल्या मुलाला एखाद्या प्रसंगावरून जरी एखादी गोष्ट सांगायची झाली की परत त्या आठवणी ताज्या होतात. म्हणून माणूस कितीही मोठा झाला तरी शाळा व शाळेच्या आठवणी तशाच राहतात. त्या विसरता येत नाहीत व त्या सुखद आठवणी कधीही विसरूही नयेत.कारण बालपणीचे ते दिवस व त्या दिवसातील माझी शाळा ही काही वेगळीच दुनिया होती..
*व्हावे बाल यावे ते दिवस ..अनुभवयास मिळावे ते सुखद ,सोनेरी क्षण..!*
---------------------------------------------
*लेखक:- श्रीधर कुलकर्णी*

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट