चार देह

🌸..  चार_देह ..🌸
--------------------------

चार देह : (१) स्थूल (२) सूक्ष्म (३) कारण आणि (४) महाकारण. हे चार देह पिंडात आहेत. *(स्थूल, सूक्ष्म, कारण महाकारण। हे च्यारी पिंडीचे देह जाण ॥९.५.४)*. यातील स्थूल व सूक्ष्म देहातील तत्त्वे आणि कारण व महाकारण या देहांचे स्वरूप हा भाग रामदासस्वामींनी पुढीलप्रमाणे सांगितला आहे.

(१) पहिला स्थूल देह :-  आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी या पंच महाभूतांच्या मिश्रणाने स्थूल देह बनलेला आहे. तो चर्मचक्षूंना दिसणारा आहे. या पंचमहाभूतांचे प्रत्येकी पाच गुण आहेत. ते गुणही साहजिकच स्थूल देहात अनुभवण्यास मिळतात. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हे आकाशाचे पाच गुण आहेत. चळण, वळण, प्रसारण, निरोध व आकुंचन हे वायूचे पाच गुण आहेत. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे तेजाचे पाच गुण आहेत. शुक्र, रेत, शोणित/रक्त, लाळ, मूत्र आणि स्वेद हे आपाचे (जलाचे) पाच गुण आहेत. आणि शेवटी अस्थि, मांस, त्वचा, नाडी व रोम (ऋ केस) हे पृथ्वीचे पाच धर्म आहेत आता, प्रत्येक पाच भूतांचे पाच गुण किंवा धर्म हे प्रत्येकाचे असल्याने, एकंदर  २५ गुण किंवा धर्म या स्थूलदेहात दिसून येतात. *(पृथ्वी, आप, तेज, वायो आकाश । हे पांचाचे पंचविस । ऐसे मिळोन स्थूलदेहांस । बोलिजेते ॥असो ऐसे हे स्थूलशरीर । पंचवीस तत्त्वांचा । विस्तार ॥*

(२) दूसरा सूक्ष्म देह :- सूक्ष्म शरीर हे पाच पंचकांनीलबनलेले आहे. ही पाच पंचके अशी आहेत. : अंत:करण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे पाच मिळून अंत:करण पंचक बनते . व्यान, समास, उदान, अपान आणि प्राण मिळून प्राण पंचक होते. श्रोत्र, त्वचा, डोळा, जिव्हा व नाक हे मिळून ज्ञानेंद्रिय-पंचक होते. वाचा, हात, पाय, शिश्न व गुद हे मिळून कर्मेंद्रिय-पंचक बनते आणि शब्द, स्पर्श, (ई)प, रस व गंध या विषयांपासून विषय - पंचक तयार होते . अशाप्रकारे अंत:करण-पंचक, प्राण-पंचक, ज्ञानेंद्रिय-पंचक, कर्मेंद्रिय-पंचक आणि विषय-पंचक या पाच पंचकांनी मिळून एकूण २५ घटकांनी सूक्ष्म देह सिद्ध होतो (अंत:करण प्राण पंचक । ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये पंचक । पाचवे विषय-पंचक । ऐसीं ही पांच पंचके ॥ ऐसे हे पंचविस गुण । मिळोन सूक्ष्म देह जाण ॥

या पाच पंचकांचे किंवा पंचविस गुणांचे मिश्रण (कर्दम) सूक्ष्म शरीरात असते. त्यामुळे प्रत्येक पंचकातला एकेक घटक हा एकेका भूतांशी संबंधित होतो. म्हणजे असे : अंत:करण, व्यान, श्रवण, वाचा आणि शब्द हे आकाशाशी निगडित होतात. मन, समान, त्वचा, हात आणि स्पर्शरूप हे वायूशी संबंधित आहेत. बुद्धि, उदान, नयन, चरण आणि रूपाचे दर्शन यांचा संबंध तेजाशी आहे. चित्त, अपान, जिव्हा, शिश्न आणि रस हे आप म्हणजे जल या भूताशी संबंधित आहेत. आणि शेवटी अहंकार, प्राण, घ्राण, गुद व गंध हे पृथ्वीशी निगडित आहेत . तेव्हा नीट विचार केला म्हणजे सूक्ष्म देह वरील प्रकारचा आहे, हे कळून येते. *(ऐसा हा सूक्ष्म देह । पाहातां होईजे निसंदेह । येथ मन घालूनि पाहे । त्यासीच हे उमजे ॥*

(३) तिसरा कारण देह :-    स्थूल देह हा सर्व दार्शनिकांना मान्य आहे. काही तत्त्वज्ञान्यांनी सूक्ष्म देह स्वीकारला. त्यात नंतर कारण देह व महाकारण देह या दोन देहाची भर घातली गेली. त्यामध्ये कारणदेह हा तिसरा आहे. अज्ञान हाच कारण देह आहे .

(४) चौथा महाकारण देह :-  वर उल्लेखिलेला तिसरा कारण देह अज्ञानरूप आहे. तर चौथा देह हा ज्ञानरूप आहे. म्हणून रामदासस्वामी सांगतात, की ज्ञान म्हणजेच चौथा महाकारण देह आहे.

चार देहांची बत्तीस तत्त्वे :- वर पाहिल्याप्रमाणे स्थूल देहाची २५ तत्त्वे आणि सूक्ष्म देहाची २५ तत्त्वे होतात.

या चार देहांमुळे माणसाला चार अवस्थांतून जावे लागते. त्या चारही अवस्थेत कार्य करणारे चैतन्य (आत्मा) असतो. या चार आत्म्यांची स्थूल देहात विशिष्ट स्थाने सांगितली जातात. या चार देहात काही शक्ती कार्यप्रवण असतात आणि या चार देहाअंती माणसाला काही भोग प्राप्त होऊ शकतात. हे सर्व लक्षात घेऊन, रामदासस्वामी सांगतात : स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे देह अनुक्रमे जागृति, स्वप्न, सुषुप्ति व तुर्या या अवस्थां असतात. या चारही अवस्थेत जे चैतन्य कार्यप्रवण असते, त्याला आत्मा म्हणून भिन्न नावे दिलेली आहेत, ती अशी : या चार अवस्थांत कार्य करणारे चैतन्य म्हणजेच चार अवस्थांचे अभिमान बाळगणारे असे चार आत्मे असतात. हे म्हणजे विश्व, तैजस, प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा हे होत. या चार आत्म्यांची नेत्र, कंठ हृदय आणि मूर्धा (डोके) अशी चार स्थाने आहेत. या चार देहाद्वारा चार अवस्थांत माणसाला सुख-दु:खाचे जे भोग मिळतात, ते आहेत स्थूलभोग, प्रविविक्त भोग, आनंद भोग आणि आनंदावभास भोग
*पुढे वरील चार भागाचे विश्लेषण*.....
               —————
*संदर्भ :- दासबोध*
=========================♦
चिंतन व लेखन :- श्रीधर कुलकर्णी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट