विविध आहार ,यज्ञ,दान,व तप

विविध आहार यज्ञ, तप व दान
-------------श्री..कु..----------------

आयुष्य, मानसबल, शारीरबल, आरोग्य, सुख व प्रीति यांची वृद्धि करणारे, रसयुक्त, स्नेहयुक्त, देहांत परिणामरूपाने चिरकाल रहाणारे व हृदयाला प्रिय वाटणारे, असे आहार सात्विक लोकांना प्रिय असतात.अति कटु, आंबट, खारट, उष्ण, तिखट, रूक्ष - नीरस व दाहक म्ह. तोंडाची आग करणारे, असे आणि दुःख, शोक व रोग देणारे आहार राजस प्रकृतीला मनुष्याला आवडतात. [ या श्लोकांत राजस लोकांना आवडणारे आहार सांगितले आहेत. ‘अति’ शब्द कटु, आंबट, खारट इत्यादि सर्वांच्या मागे जोडावा. ]
अर्धे कच्चे शिजलेले, रसरहित, दुर्गंधयुक्त, शिळे, आंबलेले, वास येत असलेले, उष्टे व अपवित्र असे अन्न तामस लोकांना प्रिय असते. [ राजस व तामस आहारांचा त्याग करून सात्विक आहारांचे ग्रहण करण्यासाठी येथे तीन प्रकारचा आहार सांगितला आहे.श्री कु ]
फलाची आकांक्षा न करणार्‍या लोकांकडून शास्त्राच्या विधीने प्राप्त झालेला जो यज्ञ ‘मला हा अवश्य करावयास पाहिजे’, असे मनाचे समाधान करून केला जातो, तो *सात्विक यज्ञ* आहे.शास्त्रोक्त विधीवांचून असलेला ज्यांत अन्नदान केलेले नाही, मंत्ररहित, दक्षिणेवांचून व श्रद्धाशून्य, अशा यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात.देव, ब्राह्मण, गुरु व प्राज्ञ विद्वान् यांचे प्रणाम शुश्रुषादि पूजन, पूर्वोक्त द्विविध शुचिर्भूतपणा, अंतःकरणाचा सरळपणा, प्राण्यांना पीडा न देणे, स्त्रीशरीराशी संसर्ग न करणे, हे शरीराने होणारे तप म्हटले जाते. [ शरीर ज्यामध्ये प्रधान आहे, अशा शरीरेंद्रियादिकांनी होणार्‍या तपाला *शारीरिक तप* म्हणतात. ]
जे वाक्य प्राण्यांच्या मनांत दुःख उत्पन्न न करणारे, खरे व प्रिय आणि हितकर असते ते वाक्य व यथाविधि वेदशास्त्राध्ययन हे *,वाङ्मयतप* सांगितले जाते. [ प्राण्यांना दुःखकर न होणारे, सत्य, प्रिय व परिणामी हितावह, असे जे वाक्य, तेच श्रेष्ठ वाङ्मयतप होय. या चार विशेषणांपैकी एखादे विशेषण जरी कमी असले, तरी त्या वाक्यास वाङमयतप म्हणता येणार नाही. तसेच शास्त्रोक्त विधीने स्वाध्यायाचे आवर्तन करणे, हेहि वाङमयतप आहे. यामध्ये वाणीचे प्राधान्य असते
मनाची अत्यंत शांति, प्रसन्नता, त्यांत रागादि दोषराहित्य, हा गुण संपादन करणे, सर्वांचे हितचिंतन करणे, हेच सौम्यत्व, त्याला *‘सौमनस्य’* असेहि म्हणतात. मुखाच्या प्रसन्नतेवरून अंतःकरणाचा हा धर्म ओळखला जातो. मौन - न बोलण्याविषयी मनाचा संयम किंवा मुनीचा भाव - मनन, सर्व बाजूंनी मनाचा निरोध करणे, मनाचा निष्कपटपणा, अशा प्रकारचे तप, *मानसतप* म्हटले जाते. [ *वाणीचा संयम हा ‘मौन’ शब्दाचा खरा अर्थ आहे.* पण मानस तपामध्ये त्याचा संभव नसल्यामुळे त्या मौनाचे कारण जो मनःसंयम, त्याचे येथे ग्रहण करावे लागते. आत्मविनिग्रह - सामान्यतः सर्व विषयांपासून मनाचा निग्रह व मौन म्ह. वाक्‌विषयक मनाचाच निग्रह होय. ]
फलाची आकांक्षा न करणार्‍या समाहित चित्त म्ह. सिद्धी - असिद्धीविषयी निर्विकार अशा पुरुषांकडून अतिशय श्रद्धेने केले जाणारे जे त्रिविध तप, त्यालाच *सात्विक* असे म्हणतात.जे तप ‘हा साधु, तपस्वी ब्राह्मण आहे’, असे म्हणून लोकांनी सत्कार करावा यासाठी, त्यांनी उठून उभे रहावे, प्रणाम करावा इत्यादि मानासाठी, पादप्रक्षालन, पूजन, भोजन इत्यादि पूजेसाठी आणि दंभाने नास्तिकपणाने केवल आपले धार्मिकत्व प्रकट करण्यासाठी, आचरिले जाते, ते याच लोकी फल देणारे असल्यामुळे, राजस, चल व त्याचे फल अनियत असल्यामुळे अध्रुव म्हटले आहे. [ अशा राजस तपाला त्याज्य मानावे. ]जे तप अविवेकयुक्त निश्चयाने स्वतःच्या देहादिकांना पीडा देऊन किंवा दुसर्‍याच्या उत्सादनार्थ विनाशासाठी केले जाते, त्याला तामस म्हटले आहे. *‘मला हे दान द्यावयाचे आहे.* त्याच्या फलादिकांची इच्छा करावयाची नाही’ अशी भावना करून जे दान अनुपकारी - उलट उपकार करण्यास असमर्थ असलेल्या मनुष्याला दिले जाते, किंवा प्रत्युपकार करण्यास समर्थ असलेल्याहि निरपेक्ष - प्रत्युपकाराची अपेक्षा न करतां, कुरुक्षेत्रादि पवित्र प्रदेशी, संक्रांत्यादि पर्वकाली व षडंगवेत्ता, षट्‌शास्त्रज्ञ, वेदपारंगत इत्यादिकांस दिले जाते, ते दान *सात्विक** म्हटलेले आहे.जे दान अमंगल मनुष्ये व पदार्थ यांचा ज्याच्याशी संसर्ग झाला आहे, अशा अपवित्र प्रदेशी, तसेच अकाली पुण्यहेतुत्वाने प्रख्यात नसलेल्या, संक्रांत्यादि विशेषरहित काली आणि सत्पात्र नसलेल्या मूर्ख, चोर इत्यादिकांना, तसेच देशादि संपत्ति जरी असली म्ह. योग्य देश, काल व पात्र जरी असले तरी प्रिय भाषण, पादप्रक्षालन, पूजा इत्यादि न करतां अवज्ञेने सत्पात्राचा तिरस्कार करून जे दान दिले जाते, त्याला *तामस दान* म्हटले जाते.
*संदर्भ व साहाय्य :- श्रीमद्भगदगीता*
========================📓
चिंतन व लेखन
अधिकृत लेखन :- श्रीधर कुलकर्णी*
नाव वगळु नका खुप वेळ खर्ची लागतो...😁

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट